तळेरे,दि.३० जून
वटपौर्णिमा हा विवाहित महिलांच्या श्रद्धा, उत्साह आणि आनंदाचा सण. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून सात प्रदक्षिणा घालत सात जन्म हाच पती लाभावा, अशी प्रार्थना करतात. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे काही ठिकाणी वटवृक्षाच्या फांद्या तोडून घरी आणून पूजा करण्याची पद्धत वाढत असून त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे बिघडत चाललेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने दारूम ग्रामपंचायत व दारूम महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात महिलांनी प्रत्यक्ष वटवृक्षाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करत वटवृक्षाच्या रोपांची लागवड केली. श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून “वृक्ष वाचवा, वृक्ष लावा” हा प्रभावी संदेश देण्यात आला.
या उपक्रमासाठी सरपंच तेजस्वी लिंगायत यांनी पुढाकार घेत आवश्यक ते सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्या समृद्धी तावडे व वैशाली कल्याणकर यांच्यासह प्रभावती चव्हाण, पल्लवी गुरव, प्रभाली तळेकर, श्वेताली पांचाळ, मृदुला गिरकर, कामिनी सावंत, धनश्री एडगे, प्रिया वातकर, गार्गी भांबुरे, पुनम कल्याणकर आणि भाग्यश्री कल्याणकर यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम दारूम गावासाठी अभिमानास्पद ठरला असून इतर गावांसाठीही तो निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.