संतांच्या विचारांची नव्या पिढीशी घडलेली भक्तिमय भेट म्हणजेच कासार्डेतील प्रतिकात्मक रिंगण सोहळा…
तळेरे,दि.२५ जुलै
आषाढी वारीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील 'कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे' प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या आषाढी वारी प्रतिकात्मक दिंडी आणि रिंगण सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
विद्यालयाच्या मैदानावर साक्षात विठ्ठल रखुमाई,संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत सोपानदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषेत विद्यार्थी वारकरी पालखी घेऊन आणि टाळ- मृदुंगाचा ठेका धरत अवतरले आणि जणू संतांचा मेळाच भरल्याचा भास निर्माण झाला.
हातात टाळ, मृदंग, वीणा, भगवे पताके आणि मुखी “ज्ञानोबा-तुकोबा”चा जयघोष अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी दिंडी काढत संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय केला. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या ‘प्रतिकात्मक रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी परंपरेतील फुगड्या, अभंग, भजन आणि नृत्य सादरीकरणात विद्यार्थी अक्षरशः दंग झाले होते. या रिंगण सोहळ्यात वारकरी फुगड्या घालून शिक्षकांनीही विद्यार्थ्यांबरोबर आषाढी वारीचा आनंद लुटला.या सोहळ्यात सुमारे ९०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे सोहळ्याला भव्यतेची किनार लाभली.
आषाढी वारी निमित्ताने शनिवारी सकाळाच्या सत्रात संपन्न झालेल्या दिंडी सोहळ्यातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, समता, बंधुता, भक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. आधुनिक युगातही संतांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला.
“ज्ञानोबा-तुकोबांच्या नामघोषात रंगलेले हे रिंगण सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हते, तर संतांच्या विचारांची नव्या पिढीशी घडलेली भक्तिमय भेट होती.”