४९.५० मीटर भालाफेक करीत कोकण विभागीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक
तळेरे,दि.२५ ऑक्टोंबर
कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा सिद्धार्थ यशवंत जठार याने भालाफेक प्रकारात ४९.५० मीटर अंतराची नोंद करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळविण्याचा मान सिद्धार्थने मिळविला असून, त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी एस.व्ही.जे.सी.टी. स्क्रीडा संकुल डेरवणमध्ये कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ पार पडली. या स्पर्धेत सिद्धार्थने भालाफेकीत ४९.५० मीटर अंतर गाठत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धार्थ हा विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.ए.एफ.चा विद्यार्थी आहे.
सिद्धार्थच्या या यशामागे त्याची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द महत्त्वपूर्ण ठरली. त्याला महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. विशाल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी, समन्वयक श्रीपाद वेलिंग व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सिद्धार्थचे अभिनंदन केले.