विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे; प्रात्यक्षिकांतून सुरक्षा-जागरूकता
तळेरे,दि. १६ ऑगस्ट
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शाळा आणि NDRF यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
NDRFचे इन्स्पेक्टर राजेश कुमार,हवालदार प्रशांत कदम, अनिकेत सूर्यवंशी व शरयू साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय आणि NDRFच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी NDRFच्या पथकाने आगीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी,अग्निशामक साधनांचा योग्य वापर,आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर,बचावकार्य व प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन केले.संकटसमयी घाबरून न जाता शांतपणे व योग्य पद्धतीने कृती करण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. विविध सुरक्षा साधने व उपकरणांची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनाही या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व प्रभावीपणे समजले.विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रम उत्सुकतेने व लक्षपूर्वक पाहिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी NDRFच्या पथकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असून, संकटसमयी स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी जपावी,याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्या. सचिन शेटये यांनी केले, तर प्राध्या. आशा कानकेकर यांनी आभार मानले.
