घाटात वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
वैभववाडी,दि.०३ जुलै
करूळ घाटात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भलीमोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून प्रथम एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेले महाकाय दगड फोडून सायंकाळी उशिरा वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून वैभववाडी तालुक्यासह सह्याद्री पट्ट्यात दमदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे गगनबावड्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या करूळ घाटात अचानक मोठी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता पवन पाटील घटनास्थळी दाखल झाले. घाट मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या वेल्हाळ कंपनीच्या जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
दरडीसोबत रस्त्यावर दोन महाकाय दगडही कोसळले होते. हे दगड यंत्राच्या सहाय्याने फोडून हटविण्यात आले. त्यामुळे सायंकाळी उशिरा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि पंचायत समितीचे सभापती सिद्देश रावराणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.
चौकट :
घाटातील धोकादायक ठिकाणांचा आज सर्व्हे
यावर्षी करूळ घाटात दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे. दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन शनिवारी केंद्र सरकारच्या विशेष तज्ज्ञ पथकाकडून घाटातील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे केला जाणार आहे. या पाहणीनंतर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.