वेंगुर्ला: दाभोसवाडा येथील अखंड वीणा सप्ताहाची सांगता

शेअर करा

वेंगुर्ला,दि.१९ जुलै(प्रथमेश गुरव)

दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात सुरू असलेल्या अखंड वीणा सप्ताहाची सांगता आज रविवारी काल्याने आणि पालखी प्रदक्षिणेने झाली. तत्पूर्वी शनिवारी सप्ताहाच्या सातव्या दिवशी सायंकाळी काढण्यात आलेल्या दिंडीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाईचा अखंड वीणा सप्ताह १२ जुलैपासून सुरू झाला होता. सप्ताह कालावधीत मंदिरात विविध भजन मंडळांची संगीत व वारकरी भजने तसेच विठ्ठल रखुमाईची आकर्षक पूजा, पौराणिक कथांवर देखावे असे कार्यक्रम संपन्न झाले. सप्ताहाच्या सातव्या दिवशी शनिवारी सायंकाळी दाभोसवाडा तसेच विठ्ठलवाडी येथील वारकरी मंडळींनी वारकरी पेहराव करीत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “ज्ञानोबा तुकाराम”च्या गजरात विठ्ठल मंदिरात दिंडी आणली. या दोन्ही दिंडीत हौशी युवकांनी पौराणिक कथांवर आधारीत वेशभूषा सादर करीत रंगत आणली. दरम्यान, या दिंडीचे स्वागत करण्यासाठी दिंडी मार्ग पताकांनी सुशोभित केला होता. दोन्ही दिंड्यांमधील वारकऱ्यांनी भजनाबरोबरच “ज्ञानोबा तुकारामाच्या” जयघोषात विविध नृत्यप्रकार साजरे केले. दाभोसवाडा येथे अवतरलेले हे प्रतिपंढपूर “याची डोळा, याची देही” पहाण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, या सप्ताहाची सांगता आज रविवारी पालखी प्रदक्षिणा आणि काल्याने करण्यात आली. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

शेअर करा