झाडे कोसळून घरांचे सुमारे ₹२.८० लाखांचे नुकसान; समुद्राला उधाण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
वेंगुर्ले,दि.०५ जुलै
तालुक्यात गेले २ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळपासून पडत असलेल्या या पावसामुळे नागरिकांचे सुमारे २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच समुद्राला सुद्धा उधाण आले असून मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभाग व वेंगुर्ला तहसील कार्यालय आपत्ती विभागाकडून देण्यात आले आहे.
शनिवार ४ जुलै पासून सोसाट्याच्या वाऱ्याने व मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे ठिकठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नद्या, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहे. हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर सुद्धा सोसाट्याचा वारा व पाऊस असल्याने लाटांच्या उंचीत वाढ झाली असून मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. ताशी ३० गे ४० किमी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनाऱ्याजवळील नागरिकांना तसेच मच्छिमार बांधवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पर्यटकांनी सुद्धा समुद्राच्या पाण्यात न उतरण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
या पावसामुळे श्रीरामवाडी येथील रविंद्र गाडगीळ यांच्या घरावर झाड पडून छप्पराचे सुमारे ९० हजार, उभादांडा सिध्दार्थवाडी येथील दयानंद विष्णू बोवलेकर यांच्या घरावर झाड पडून छप्पर पत्रे यांचे सुमारे ४० हजार, वेंगुर्ले बंदररोड येथील अंजलीन फर्नांडिस यांच्या घरावर झाड पडून घराचे सुमारे १ लाख तर सुंदरभाटले येथील अजित यशवंत कनयाळकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे ५० हजारांचे असे मिळून सुमारे २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात तालुक्यात ४८ मिमी तर आतापर्यंत एकूण ६३० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती वेंगुर्ला तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.
