सावंतवाडी : वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात मळेवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

शेअर करा

कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला

सावंतवाडी,दि.०५ जुलै

मळेवाड पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सततच्या वीज खंडित होण्यामुळे घरगुती कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यावसायिक व्यवहार तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपांवरही मोठा परिणाम होत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर वीज पुरवठ्याचा लपंडाव अधिकच वाढला असून अनेकदा तासंतास वीज नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही भागात हाय व्होल्टेजच्या समस्येमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून नियमित व अखंडित वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तसेच वारंवार वीज समस्याबत जर दखल घेतली नाही तर विजेचे बिल ही भरणार नसल्याचे यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी नियोजित कामे करणे आवश्यक होती ती न झाल्यामुळेच सध्या ग्राहकांना वारंवार वीज पुरवठा खंडित समस्यांना तोंड द्यावे लागत असून, मळेवाड येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या कार्यालयात येथील ग्रामस्थांनी या प्रकरणी जात जाब विचारला मात्र या कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने ग्रामस्थांचा पाराच चढला.

संबंधित वीज वितरण विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि मळेवाड पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.नाहीतर जनआंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.

शेअर करा