फोंडाघाट, दि.०२ सप्टेंबर
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी शिक्षणाबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन आत्मविश्वासाने समाजात वावरावे, तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मनीषा महेंद्र राणे यांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या उद्घाटनाची घोषणा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, “उज्ज्वल भविष्य घडविताना स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे.” विद्यार्थिनींनी तसेच युवक-युवतींनी पारंपरिक नोकरीच्या संधींबरोबरच स्वतःचा व्यवसाय व उद्योग उभारण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध स्टार्टअप, स्वयंरोजगार आणि उद्योगविषयक योजना उपलब्ध आहेत. या योजनांचा योग्य माहिती घेऊन लाभ घेतल्यास सुरुवातीला छोटे उद्योग सुरू करता येतात. छोट्या उद्योगातून पुढे मोठ्या व्यवसायाची उभारणी होऊ शकते. त्यामुळे आर्थिक स्वावलंबनाबरोबरच इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
“समाजात वावरताना माणूस म्हणून जगणे आणि इतरांनाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्यास मदत करणे, हीच खरी समाजसेवा आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला घाबरून न जाता योग्य मार्गाने त्याचा सामना करावा, असेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोकणातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच छोटी-मोठी नोकरी स्वीकारतात. मात्र विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधींबरोबरच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वळल्यास स्वतःच्या रोजगाराबरोबरच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देता येईल.
विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासकीय योजना, स्टार्टअप, कर्ज सुविधा व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास महाविद्यालयामार्फत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन प्राचार्य डॉ. नारे यांनी दिले. तसेच महिलांनी सक्षम, स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण होणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या मोदी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.