छात्रों की गूंज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करूया; सिंधुदुर्गातून काँग्रेसची ताकद दाखवूया!-किरण टेंबुलकर

शेअर करा

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रमाचे आयोजन; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे आवाहन

कणकवली, दि. २१ ऑगस्ट

देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि युवकांचे प्रेरणास्थान राहुल गांधी हे शनिवार, २२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, पुणे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या शैक्षणिक तसेच विविध प्रश्नांकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधणार आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे ऐतिहासिक कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातील युवती आणि विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने या विद्यार्थी संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केले.

पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठ्या स्क्रीनवर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. यावेळी राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील युवक काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात सर्व विद्यार्थी, युवती, युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन किरण टेंबुलकर यांनी केले आहे.

शेअर करा