Sawantwadi News : सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांची अनुपस्थिती

शेअर करा

शेतकरी, बागायतदारांमधून तीव्र संताप

​सावंतवाडी,दि.३० ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली हत्ती व इतर वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेती व बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत सावंतवाडी येथील जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना हताश होऊन परतावे लागले. या प्रकारामुळे वनविभागाचा कारभार नेमका कोणाच्या भरोशावर सुरू आहे, असा संतप्त सवाल शेतकरी व बागायतदारांमधून विचारला जात आहे.
​सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय सावंतवाडी येथे आहे. सध्या उपवनसंरक्षक मिलिश शर्मा हे प्रदीर्घ कालावधीसाठी प्रशिक्षणावर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सातारा-कराड येथील किरण जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जगताप यांनी सावंतवाडीत येऊन पदभार स्वीकारला असला तरी कराड ते सावंतवाडी हे अंतर खूप जास्त असल्याने त्यांना नियमित उपस्थित राहणे शक्य होत नाही.
​दरम्यान, शुक्रवारी विविध समस्या व नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी काही शेतकरी सावंतवाडी कार्यालयात आले होते. मात्र, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे हे ओरोस येथे तर दुसरे सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड हे मुंबई दौऱ्यावर गेले होते. कार्यालयात जबाबदारीने उत्तर देणारा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.
​सध्या जंगलात अन्न व पाण्याचा तुटवडा असल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत शिरत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथे ‘ओंकार’ नावाचा हत्ती तर दोडामार्ग तालुक्यात इतर हत्ती आणि वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. बेसुमार वृक्षतोड आणि वन्यप्राण्यांचे आक्रमण यामुळे शेतकरी व बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. वनविभाग यावर कोणतीही तत्परतेने पावले उचलत नसल्याने नागरिकांमधून आंदोलनाचा पवित्रा घेतला जात आहे. अशा संवेदनशील काळात जिल्हा कार्यालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने वनविभागाच्या कारभारावर जोरदार टीका होत आहे.

शेअर करा