उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनाकारण आरोप सहन करणार नाही ; ‘भाजपलाही आम्ही आमचेच कुटुंब मानतो’
कुडाळ,दि.३० ऑक्टोंबर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना कोणी दिला.’भाजपलाही आम्ही आमचेच कुटुंब मानतो, असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनाकारण आरोप सहन करणार नाही.भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका करताना विचार करावा.युतीमध्ये राहून एकमेकांवर आरोप करणे योग्य नाही. वर्षानुवर्षे ही युती टिकली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वक्तव्य करावे,असा टोला शिवसेना आ. निलेश राणे यांनी लगावला.
कुडाळ येथील बजाज शोरुम येथे शिवसेना-भाजप युतीतील राजकीय वक्तव्याबाबत आ.निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख दिनेश नारकर, जि.प.सदस्या दीपलक्ष्मी पडते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनाथ बन हे सातत्याने शिवसेनेवर विनाकारण आरोप करत आहेत. आम्ही कधीही भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याला निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरलेले नाही. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा नियोजनात कुठे चूक झाली, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आमचाही पुरस्कृत उमेदवार होता. त्यामुळे एका निवडणुकीतील पराभवासाठी दुसऱ्या पक्षाला जबाबदार धरण्याचा प्रकार योग्य नाही.नवनाथ बन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन वक्तव्य करण्यापूर्वी त्यांना भाजपमधून कोणाची संमती आहे, हे स्पष्ट करावे. तुम्ही प्रवक्ते आहात, प्रवक्त्याचे काम करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनाकारण आरोप करणे थांबवा, तुमचे राजकीय करिअर नुकतेच सुरू झाले आहे. विनाकारण नको त्या विषयात पडू नका, असा इशारा नवनाथ बन यांना आ. निलेश राणे यांनी दिला आहे.
‘युतीतील प्रत्येक निवडणुकीची पुस्तके उघडायची का?’
युतीतील निवडणुकांमध्ये नेमके काय घडले, यावर बोलायला गेलो तर अनेक पुस्तके उघडतील. मालवण नगरपालिका निवडणुकीच्या वेळी काय घडले, याचीही माहिती देता येईल. मात्र, आपण युतीमध्ये आहोत, एकमेकांचे मित्र आणि सहकारी आहोत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीतील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याऐवजी नियोजनातील चुका सुधारण्यावर भर दिला पाहिजे. अशा आरोपांमुळे विरोधकांना फायदा होतो. त्यामुळे युतीतील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवावा, असे आ. निलेश राणे यांनी सांगितले.
‘भाजपलाही आम्ही आमचेच कुटुंब मानतो’
सातारा जिल्ह्यातील वाई आणि फलटणची जबाबदारी आपल्याकडे होती. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहकार्य करण्याबाबत भाजपकडून कोणीही आपल्याशी संपर्क साधला नव्हता. तरीही आपल्याकडून कर्तव्य पार पाडण्यात आले. आम्हाला काम कसे करायचे हे कोणी शिकवू नये.भारतीय जनता पक्ष हा आमचाच पक्ष आहे, असे आम्ही समजतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वहिनी या सर्वांना आम्ही युतीतील नेते म्हणून मानतो. युतीमध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले पाहिजे आणि ते वर्षानुवर्षे टिकले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. काही लोकांच्या वक्तव्यांमुळे युतीचे वातावरण खराब होऊ देऊ नये, असे निलेश राणे म्हणाले.
आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील
आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विचारले असता, शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. याबाबत पक्ष म्हणून योग्य ती कारवाई पक्षश्रेष्ठी करतील. अब्दुल सत्तार यांच्या टीकेबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, विचार न करता बोलणे ही त्यांची जुनी पद्धत आहे. आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो आणि कोणत्या पक्षातील कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांची वक्तव्ये पाहत आलो आहे. त्यांच्या वक्तव्यांना आपण कधीही महत्त्व दिलेले नाही, असे आ. निलेश राणे यांनी सांगितले.