स्थानिक मच्छीमारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे; शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांचे आवाहन
देवगड,दि.३० ऑक्टोंबर
देवगड तालुक्यातील बागवाडी जेटी येथे प्रस्तावित कयाकिंग प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बागवाडी येथील कयाकिंग प्रकल्पावरून स्थानिक मच्छीमार आणि संबंधित व्यावसायिक यांच्यात निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस गंभीर होत असून, या प्रकरणात स्थानिकांच्या भावना आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचा विचार होणे आवश्यक आहे. या प्रश्नावर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेऊन संबंधितांमध्ये समन्वय साधावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
तसेच या विषयाला राजकीय वळण न देता स्थानिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचेही जोगल यांनी नमूद केले आहे.
शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी या विषयात योग्य भूमिका घेऊन स्थानिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.