वैभववाडी : दहावी कॉपीप्रकरण : दोन्ही संस्थांवर प्रशासक नेमण्यासाठी धर्मदाय आयुक्तातांना प्रस्ताव..

शेअर करा


वैभववाडी,दि.११ सप्टेंबर


    भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील कॉपीप्रकरणात दोषी ठरलेल्या माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड व न्यू इंग्लिश स्कुलचे सहाय्यक शिक्षक संजयकुमार आडे यांच्यावर अद्याप संस्थेमार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित दोन्हीही संस्थांवर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यासाठी शिक्षण उप संचालक पुणे यांनी धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आता धर्मदाय आयुक्तांच्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
    जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना याबाबत पत्र पाठविले होते. सदरचे पत्र शिक्षण संचालकांनी दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी सदरचे पत्र पुढील कारवाईसाठी धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना पाठविले आहे.
     भुईबावडा केंद्रावर इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपीप्रकरणात माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड यांना दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाच्या रत्नागिरी विभागीय सचिवांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत लेखी निर्देश दिले होते.
    त्यानुसार मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड तसेच न्यू इंग्लिश स्कूल, हेत येथील सहाय्यक शिक्षक संजयकुमार खेमा आडे यांच्याविरुद्ध 23 जून 2026 रोजी वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राठोड यांना 15 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पोलीस तसेच न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. सहाय्यक शिक्षक आडे यांनाही 20 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची 22 जुलै रोजी जामिनावर मुक्तता करण्यात आली.
    पत्रानुसार, संबंधित मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक हे 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलीस व न्यायालयीन कोठडीत असल्याने महाराष्ट्र खाजगी शाळांतील सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम 33 मधील पोटनियम 5 नुसार आवश्यक ती कारवाई होणे अपेक्षित होते.
मुख्याध्यापक संजय राठोड यांना निलंबित करण्याबाबत पंचक्रोशी मंडळ, उंबर्डे-वैभववाडीच्या अध्यक्ष व सचिवांना यापूर्वीच आदेश देण्यात आले होते. मात्र, संस्थेने अद्याप त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली नाही. या प्रकरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही वारंवार विचारणा होत होती. दरम्यान, संबंधित दोन्ही संस्थांनी प्रकरणाची अपेक्षित गांभीर्याने दखल न घेतल्याने आता या संस्थांवर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती. याबाबत शिक्षण संचालकांनी सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्याकडे वर्ग केले आहे. त्यामुळे आता धर्मदाय आयुक्त काय कारवाई संस्थेवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागले आहे..

शेअर करा