आठवडा बाजारातील रस्त्यावरील अवास्तव मांडणीला बसणार चाप, पालन न करणाऱ्यांना दंडाची तंबी
आचर,दि.१० ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)
आचरा बाजारपेठेत आठवडा बाजाराच्या दिवशी वाढणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी,
सोडवण्यासाठी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी सरपंच व्यापारीआणि रिक्षाचालकांसोबत
थेट बाजाराची पाहणी करत विक्रेत्यांना रस्त्यावर अडथळा होणार नाही याची काळजी घेत आपल्या विक्री च्या सामानाची योग्य प्रकारे मांडणी करण्याच्या सुचना केल्या.
आचरे गावच्या आठवडा बाजाराच्या दिवशी बाहेरील विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. बाजाराची व्याप्ती ही आचरा तिठ्याच्या आसपास पोहोचली आहे. विक्री साठी येणाऱे
विक्रेते रस्त्यावर अवास्तवपणे माल मांडत आहेत. याचा थेट फटका पादचारी आणि रिक्षा वाहतुकीला बसत आहे.यातच टूव्हिलरवर बसूनच खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे नागरिकांनाही चालण्यासाठी जागा मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या.शिवाय एक दिशा मार्गाचाही अवलंब होत नसल्याने बाजारपेठेतील दुकानदार, याभागात राहणारे ग्रामस्थ, यांना आठवडा बाजारात तातडीच्यादृष्टीने वाहन उपलब्ध होणे त्रासदायक ठरत होते.याबाबत ग्रामस्थ, व्यापारी यांच्या मागणीनुसार आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी,आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, खजिनदार जयप्रकाश परूळेकर त्यांच्या सह आचरा तिठा ते बाजारपेठ पर्यंत बाजारा दिवशी उद्भवणाऱ्या परीस्थितीची पहाणी केली.यावेळी त्यांच्या सोबत व्यापारी संघटनेचे राजन पांगे,ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,पंकज आचरेकर, तसेच जगदीश पांगे,रिक्षा संघटनेचे श्रीपाद वायंगणकर,आबा भाटकर, मिराशी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब,रूपेश परब आदी सहभागी झाले होते.आज झालेल्या पाहणीत सहा. पोलीस निरीक्षक कातीवले यांनी विक्रेत्यांना थेट सूचना दिल्या. रस्त्यावर मांडलेली दुकानांची सुव्यवस्थित मांडणी होण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे रस्त्याला पट्टे मारण्यात येणार असल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.या पट्ट्यांच्या पुढे येणा-या विक्रेत्यांवर तसेच दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बाजारात होणारी टू-व्हिलर आणि फोर-व्हिलरची बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी योग्य ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याबाबतही यावेळी नियोजन करण्यात येवून वाहनतळासाठी जागा ठरविण्यात आल्या. वाहनचालकांना समजण्यासाठी तेथे फलकही लावण्याच्या सुचना ग्रामपंचायत ला दिल्या.त्यामुळे बाजारात दुचाकी आणण्याऐवजी नागरिकांनी ठराविक पार्किंगचाच वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एसटी थांबा जागा बदलणार
आचरा देवगड बाजूला जाणा-या एसटी बस कावले दुकाना समोर तर मालवण बाजूला जाणाऱ्या एसटी बस तिठ्यावरच थांबत असल्याने वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होत असते.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच लक्ष वेधल असता चतुर्थी पुर्वी वाहतूक कोंडी सुटण्याच्या दृष्टीने देवगड बाजूला तेजस हार्डवेअर समोर तर मालवण बाजूने नलावडे हॉटेल पुढे एसटी बस थांबण्यासाठी एसटी प्रशासनाला योग्य त्या सुचना केल्या जातील असे कातीवले यांनी स्पष्ट केले.