आचरा,दि.१७ सप्टेंबर (अर्जुन बापर्डेकर)
गणपती बाप्पा पाठोपाठ गुरुवारी सकाळी टाळ, घंटांनादाच्या निनादात गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.आचरादेवूळवाडी पुजारेवाडी येथील पंचवीस ते तीस कुटुंबाचा गणपती असलेल्या सार्वजनिक घरात सर्व महिलांनी एकत्र येत
विहिरीवरुन पारंपरिक पद्धतीने गौराईलाआणून विधिवत पूजन केले.
कोकणात गणेशोत्सवात गौराईचे आगमन अत्यंत उत्साही पारंपरिक आणि महत्वाचे मानले जाते.विहिर किंवा जवळच्या पाणवठ्यावरुन गवर आणण्याची प्रथा आहे.घरातील महिला गौराईचे स्वरूप हळदीचे रोप,तुळस,तिरडा,आघाडी,लालभाजीचे रोप अशा पाच वनस्पती एकत्र करून वाजतगाजत आणून पुजा केली जाते.घरात प्रवेश करतानाही उंबरठ्यापासून देवीच्या पावलांचे ठसे काढण्याची सुंदर परंपरा आपल्या कडे दिसून येते.उंबरठ्यापासून पूजेच्या ठिकाणापर्यंत काढलेली ही पावले गौरीच्या शुभ आगमनाचे आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
कोकणात काही ठिकाणी नेसविलेली गौरी पूजन केले जाते तर बहुतांशी ठिकाणी पाच रोपे एकत्र करून पुजली जातात.
आचरा येथे गुरुवारी सकाळी जवळच्या पाणवठ्यावरुन गवर आणण्याची लगबग दिसून येत होती.गणेश आगमनाबरोबर रात्रौ भजन फुगडी च्या स्वरांनी घरोघरी भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे