आचरा : आचरा समुद्रकिनारी वादळी वाऱ्यामुळे रिसॉर्टचे नुकसान

शेअर करा

आचरा,दि.२३ जून
आचरा येथील पिरावाडी समुद्रकिनारी सायंकाळी गेलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक रिसॉर्टचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे काही रिसॉर्टच्या पत्र्यांची उडाल्याने मालमत्तेचे नुकसान झाले असून पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य चालू केले होते. वादळी वाऱ्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.

या घटनेत श्रीमती शलाखा कांदळगावकर यांच्या रिसॉर्ट चे पूर्ण पत्रे उडून आतील किंमती सामान भिजून मोठे नुकसान झाले आहे. सुशमा कोयंडे , प्रफुल्ल भाबल आणि सायली सारंग यांच्या रिसॉर्टचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेली असून मोठी किंमती वस्तूंची हानीही झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आचरा ग्रामपंचायतीचे सरपंच जेरोन फर्नांडिस, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, तन्वी जोशी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. संबंधितांचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
फोटो परेश सावंत
आचरा समुद्रकिनारी वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून रिसॉर्ट धरकांचे नुकसान झाले

शेअर करा