नैसर्गिक आपत्ती दूर करण्यासाठी घातले साकडे
आचरा,दि.२३ जून (अर्जुन बापर्डेकर)
या वर्षी अल निनोमुळे सर्वत्र पर्जन्यराजाची अवकृपा होत आहे.त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकरी राजा संकटात सापडला आहे.याबाबत देवाला साकडं घालून निसर्गाची अवकृपा दूर व्हावी चांगले पर्जन्यमान व्हावे शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे या हेतूने श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गावच्या प्राचीन परंपरेनुसार मंगळवारी सकाळी रामेश्वर मंदिरा लगतच्या श्री देव ठाणेश्वराच्या पिंडींवर देवस्थान मानकरी, देवस्थान समिती, यांच्या सह समस्त आचरे वासियांनी एकत्र येत जलाभिषेक करत काही काळ पिंडी पाण्याखाली ठेवली.सुमारे तास सव्वा तास सुरू असलेल्या या जलाभिषेकाला रामेश्वर मंदिरा लगतच्या विहिरीवरुन सर्व बारापाच मानकरी, देवस्थान समिती सह ग्रामस्थांनी ओळीने कळशा बादली भरून जलाभिषेक केला.सुरूवातीला रामेश्वरास ,ठाणेश्वरास सांगणे करुन पारंपारीक ताशाच्या वाद्यावर जलाभिषेकास सुरुवात करण्यात आली. सुमारे तासा भराने संपूर्ण गाभारा पाण्याने भरुन ठाणेश्वर पिंडी पाण्याखाली गेली.

या प्रथेबाबत बोलताना देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांनी सांगितले की सध्याच्या ओढवणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वत्र सुका दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.संकटात देव पाण्यात ठेवण्याची संततधार जलाभिषेक करण्याची आपली परंपरा आहे.यानुसारच आचरे गावात प्राचीन काळापासून सुरु असलेल्या परंपरेनुसार मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्री देव ठाणेश्वरावर पिंडी पाण्याखाली जाईपर्यंत सर्वांच्या सहकार्याने जलाभिषेक करण्यात आला. यामागे श्री देव रामेश्वर,ठाणेश्वराच्या कृपेने आलेले संकट दूर होईल अशी सर्वांची श्रद्धा आहे.पुर्वीही अशा प्रकारे संकट दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.तर देवस्थान समिती सदस्य संजय मिराशी यांनी आमच्या रुढी परंपरेनुसार जनकल्याणासाठी आलेले सुक्या दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी आम्ही आचरे वासियांनी देवाला आमच्या परंपरेनुसार साकडे घातले असल्याचे सांगितले.