आचरा : बुधवळे परिसरात गव्यांचा धुमाकूळ; हातातोंडाशी आलेली शेती उद्ध्वस्त झाल्यानेशेतकरी आर्थिक संकटात

शेअर करा

वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा – ग्रामस्थांची मागणी

आचरा,दि.०८ सप्टेंबर (अर्जुन बापर्डेकर)
बुधवळे परिसरात गव्यांनी (गवारेडे) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सहा ते सात गवे भात, भुईमूग, उडीद, नाचणी सोबतच काकडी, चिबूड, पडवळी यांसारख्या भाजीपाल्याचेही मोठे नुकसान करत आहेत. वडीलोपार्जित शेती सुरू रहावी म्हणून काही शेतकऱ्यांनी उसनवार कर्ज काढून केलेली शेती वन्य प्राण्यांच्या अशा उपद्रवामुळे मातीमोल होत आहे.
ऐन पोटरीवर आलेले भात गवे खाऊन फस्त करत असल्याने
शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळेल आहे.याबाबत वनविभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बुधवळे ग्रामस्थांकडून होत आहे.
माकडांसोबतच भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करताना मेटाकुटीस आलेल्या बुधवळे येथील शेतकऱ्यांना आता गव्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. रात्रीच्या वेळी सहा ते सात लहान मोठे गवे शेतात घुसून तयार होत असलेली भात , भुईमूग,नाचणी शेतीच फस्त करत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. गवारेड्यांच्या उपद्रवामुळे
संदीप बुधवळेकर सुभाष कदम, संजय कदम, दिलीप पडवळ, विश्वास हिर्लेकर, गुरूदास घाडी, उत्तम गावडे, प्रकाश कामत, विलास कामत, संतोष चिंदरकर अमोल चिंदरकर, संदीप कुवळेकर संदीप घाडी, विकास चिंदरकर, देवदास घाडी आदी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
याबाबत माहिती देताना बुधवळे येथील शेतकरी संदीप बुधवळेकर सांगतात, “बुधवळे येथे गव्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने या बाबत तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. कर्ज-उसनवारी करून मोठ्या कष्टाने केलेल्या शेतीचे नुकसान बघवत नाही.
गवे व माकडे यांच्यामुळे बुधवळे येथील शेतकरी हैराण झाला असून शेती करावी की नाही, हा प्रश्न बळीराजापुढे उभा ठाकला आहे. सध्या रात्रीच्या वेळी गवे, मोकाट जनावरे तर दिवसा माकडे शेतीची नासधूस करत आहेत. तरी यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी.
जर शासनाला व वन विभागाला गव्यांचा व माकडांचा बंदोबस्त जमत नसेल, तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी बुधवळेकर यांनी केली आहे.
वनविभागाचे अधिकारी तुम्ही अर्ज करा, नुकसान भरपाई मिळवून देतो असे सांगतात मात्र, नुकसान भरपाई पाच ते दहा हजार मिळणार असताना आज शेतकऱ्यांचा खर्च अनेक पटीने वाढला आहे, त्यामुळे ही भरपाई तोकडी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.यामुळे वनविभागाने याची तातडीने दखल घेत गव्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत असल्याचे बुधवळेकर यांनी सांगितले.

शेअर करा