उद्या सकाळी ६.३० वाजता विशाल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा; १८, १० व ५ कि.मी. गटांत राज्यभरातील सुमारे हजार स्पर्धकांचा सहभाग.
आंबोली,दि.०१ ऑगस्ट
सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून उद्या, रविवार सकाळी ६.३० वाजता या भव्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र भाजप युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. स्पर्धा १८ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास एक हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता असून, त्यानिमित्ताने आंबोली येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक व क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी बोलताना युवानेते विशाल परब यांनी सांगितले की, आंबोलीसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला अशा उपक्रमांमुळे अधिक प्रसिद्धी मिळेल. पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, नियमित व्यायाम व धावण्याची सवय लावावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.
विशेष म्हणजे विशाल परब आणि वेदिका परब हे देखील या मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही विशाल परब यांनी केले.
आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे क्रीडा, पर्यटन आणि आरोग्य जनजागृतीला निश्चितच मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.