बांदा : आरोसबाग तिठ्यावर गोवा बनावटीच्या दारूसाठ्यावर छापा; 10.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

शेअर करा

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई; ठाणे येथील आरोपी ताब्यात


बांदा ,दि.०७ ऑगस्ट
जुना पत्रादेवी-बांदा मार्गावरील आरोसबाग तिठ्याजवळ गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने शुक्रवारी सकाळी धडक कारवाई करत १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ठाणे जिल्ह्यातील रितेश प्रभु म्हात्रे (वय ३५, रा. तुर्भे) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इन्सुली तपासणी नाक्याचे पथक शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजता जुना पत्रादेवी-बांदा मार्गावर संशयित वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एमएच ४३ एजे १८१९ क्रमांकाची राखाडी रंगाची टोयोटा इनोव्हा संशयावरून अडविण्यात आली. वाहनाची कसून तपासणी केली असता मागील सीट व डिकीत गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या बाटल्या लपवून ठेवलेल्या आढळल्या.
पथकाने वाहनातून ३० बॉक्समधील एकूण ५४० दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त दारूसाठ्याची किंमत ४ लाख २४ हजार ८०० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ६ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा देखील ताब्यात घेण्यात आली. अशा प्रकारे एकूण १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम तसेच जवान संदीप कदम, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले आणि अभिषेक खत्री यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करीत आहेत.

शेअर करा