बांद्यात चार मजली इमारतीवरून पडून १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शेअर करा

काळसेवाडीतील स्मशानभूमीजवळील घटना; अवघ्या तीन दिवसांवर असलेला १८वा वाढदिवस काळाच्या पडद्याआड

बांदा,दि.०४ ऑगस्ट

बांदा येथील काळसेवाडी परिसरातील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या चार मजली इमारतीवरून पडल्याने १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांनी त्याचा १८वा वाढदिवस होणार असल्याने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, असगर सब्रतू अली (वय १७ वर्षे ११ महिने, मूळ रा. गोराधिया, बटना, जि. कतिहार, बिहार) हा आठ दिवसांपूर्वी कॉन्ट्रॅक्टर फुलाराम रामस्वरूप कुमावत यांच्याकडे काम करणारा कामगार मोहम्मद साबुद अली याच्या ओळखीने काळसेवाडी येथील बांधकामाच्या ठिकाणी राहण्यासाठी आला होता. काही दिवसांनी तो आपल्या गावी जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

सदर चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कामगार वास्तव्यास होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास असगर इमारतीवरून खाली पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कामगारांना तो इमारतीखाली पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडाला व डोक्याच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली होती तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. घटनेची माहिती कॉन्ट्रॅक्टर फुलाराम कुमावत यांना देण्यात आली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत असगरला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे, असगरचा जन्म ७ ऑगस्ट २००८ रोजी झाला असून, अवघ्या तीन दिवसांनी त्याचा १८वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आनंदापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली

शेअर करा