Kankavli News : सत्ताधाऱ्यांकडून बोगस प्रकल्प आणण्याचे काम – सुशांत नाईक

शेअर करा

सिंधुदुर्गाचा शाश्वत विकास सत्ताधारी करणार नाहीत; राणे कुटुंबीयांची गेली ३० ते ३५ वर्षे जिल्ह्यावर सत्ता असूनही बेरोजगारी

कणकवली,दि. ३१ ऑक्टोबर

सिंधुदुर्ग जिल्ह्याला शाश्वत विकासाची गरज असताना सत्ताधारी राणे कुटुंबीयांकडून जिल्ह्याच्या विकासाचे कोणतेही व्हिजन न ठेवता बोगस प्रकल्प आणण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्यात बोगस प्रकल्प आणून त्यातून १० टक्के कमिशन घेण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केला. राणे कुटुंबीयांची गेली ३० ते ३५ वर्षे जिल्ह्यावर सत्ता असूनही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारा शाश्वत विकास झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजू राठोड, नाटळ विभागप्रमुख गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.

मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित असलेल्या कायकिंग पर्यटन प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. मात्र, प्रकल्पाचे काम स्थानिकांनी बंद पाडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणून ग्रामस्थ व मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप नाईक यांनी केला.

या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना ठामपणे उभी आहे. पालकमंत्र्यांनी स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला. देवगडमध्ये सुरू झालेले वॅक्स म्युझियम, रो-रो सेवा यांसारखे प्रकल्प बंद पडले आहेत. याबाबत पालकमंत्री का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना गोवा तसेच अन्य ठिकाणी उपचारांसाठी पाठवावे लागत आहे. रुग्णालयांची स्थिती सुधारण्यात पालकमंत्री अपयशी ठरले असून, सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा कधी मिळणार, असा सवाल नाईक यांनी केला.

मुगणे येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाही दिल्लीतील नेत्यांच्या दबावामुळे हा प्रकल्प स्थानिकांवर लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कणकवली शहरातील कचरा प्रकल्पाबाबतही पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, हा प्रकल्प शहरात यशस्वी होणार नाही, असे आम्ही आधीच सांगितले होते. लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या पालकमंत्र्यांना कचरा प्रकल्पाच्या यशस्वितेबाबत समजत नाही; मात्र स्थानिकांना त्याची जाणीव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ओरोस ते देवगड अंतर कमी करण्यासाठी नवीन रस्त्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे. काही ठेकेदारांच्या सल्ल्यानुसार हा मार्ग प्रस्तावित करण्यात आल्याचा दावा नाईक यांनी केला. या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, प्रत्यक्षात हा मार्ग तयार झाल्यानंतरही ओरोस-देवगड प्रवासासाठी अधिक वेळ लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली केवळ प्रकल्पांची घोषणा करण्यापेक्षा स्थानिकांना विश्वासात घेऊन रोजगारनिर्मिती, आरोग्य सुविधा आणि पारंपरिक व्यवसायांना पूरक असा शाश्वत विकास करावा, अशी भूमिका सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

शेअर करा