बांदा : नादुरुस्त एसटी बस तात्काळ बदलण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

शेअर करा

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


बांदा,दि.०९ जुलै


सावंतवाडी आगारातून ग्रामीण भागात धावणाऱ्या नादुरुस्त एसटी बस तात्काळ सेवेतून काढून त्यांच्या जागी नवीन अथवा सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आठ दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी आगारातील अनेक बस अत्यंत जीर्ण अवस्थेत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बसमधून पावसाचे पाणी गळणे, आसनांची दुरवस्था, वाहनांतून येणारा प्रचंड आवाज, तुटलेल्या खिडक्या, सामान ठेवण्याची अपुरी व्यवस्था तसेच ब्रेक व इतर यांत्रिक बिघाडांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. काही बस वारंवार नादुरुस्त होत असल्याने नियोजित वेळापत्रकही विस्कळीत होत असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो प्रवासी दररोज या बससेवेवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या नादुरुस्त बस तात्काळ बंद करून त्यांच्या दुरुस्ती अथवा बदलीची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार बांदा–बोरवली एसटी बससेवाही तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, सदस्य संदीप बांदेकर, तालुका सरचिटणीस स्वप्नील राऊळ, युवा मोर्चा सदस्य विनायक झाट्ये तसेच तालुका उपाध्यक्ष सुहास राऊळ आदी उपस्थित होते.

शेअर करा