बांदा,दि. ०९ जून
इन्सुली चेकनाक्यावर नियमित वाहन तपासणीदरम्यान बांदा पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ४ लाख २ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ६.५० वाजता पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुरणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गुरुनाथ परब, पोलीस कॉन्स्टेबल नेल्सन फर्नांडिस हे इन्सुली चेकनाक्यावर नियमित तपासणी करत होते. त्यावेळी एमएच-०७-टी-१४४९ क्रमांकाच्या वोक्सवॅगन पोलो कारची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली.
या कारमधून मॅकडॉवेल्स नंबर वनच्या ४८ बाटल्या, रॉयल स्टॅगच्या ९६ बाटल्या, रॉयल चॅलेंजच्या १९२ बाटल्या तसेच बॉब्स लेमन व्होडकाच्या ३८४ बाटल्या असा एकूण १,०४० हून अधिक बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. यासह ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४,०२,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संदीप शंकर जगताप (वय ४८, रा. गुरामवाडी-कट्टा, ता. मालवण) व उमेश परशुराम वडर (वय ३४, रा. गुरामवाडी-कट्टा, ता. मालवण) यांच्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ)(इ), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल नेल्सन इलियास फर्नांडिस यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार (एएसआय) देसाई करत असून या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील यांनीही सहकार्य केले. सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.