बांदा प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची भाजप महिला आघाडीची मागणी

शेअर करा

अबूसाद इब्राहिम शहा याच्यावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून निष्पक्ष, पारदर्शक व जलद तपासाची मागणी; बांदा पोलीस ठाण्यात निवेदन सादर.

बांदा,दि.१८ जुलै


बांदा येथे घडलेल्या गंभीर घटनेप्रकरणी आरोपी अबूसाद इब्राहिम शहा याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून जास्तीत जास्त कलमांखाली गुन्हा दाखल करावा, तसेच प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे बांदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले.

महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, अशी मागणी भाजप बांदा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा रूपाली शिरसाट यांनी केली.

यावेळी बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका नाईक, महिला आघाडीच्या स्मिता पेडणेकर, माधवी गाड, अवंती पंडित, भाजप बांदा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब तसेच भाजप पदाधिकारी संदीप बांदेकर, अमित घोंगडे, साईशकुमार केसरकर, राकेश केसरकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलीस प्रशासनाने निवेदनाची दखल घेत प्रकरणाचा सखोल तपास करून कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

शेअर करा