ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी दि.२९ ऑक्टोबर
सावंतवाडी तालुक्यातील विलवडे व वाफोली येथील बेकायदेशीर आणि विनापरवाना सुरू असलेल्या दगड खाणी व खडी मशीन (क्रशर) तातडीने बंद करण्यात याव्यात, अशी मागणी विलवडे आणि वाफोली येथील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात कृष्णा सावंत व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विलवडे गावात एकच छोटासा डोंगर असून, या डोंगराच्या सर्व बाजूंनी तब्बल सहा खाण मालकांनी प्रमाणाबाहेर आणि बेकायदेशीरपणे अनधिकृत उत्खनन (खोदकाम) केले आहे. या खाणींना परवानगी देताना तहसीलदार व उपविभागीय महसूल अधिकारी, सावंतवाडी यांनी ग्रामपंचायतीची हरकत नसतानाही परवानगी दिली आहे, तसेच अनेक ठिकाणी उत्खनन नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच मंडळ अधिकारी, बांदा यांनी केलेल्या स्थळ पाहणी अहवालात अनेक त्रुटी असून, जुन्या आणि नव्या खाणींबाबतची माहिती दिशाभूल करणारी आणि परस्परविरोधी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘सिटिंग क्रायटेरिया’नुसार दगड उत्खनन व क्रशरचे मापन करणे बंधनकारक असताना, आजतागायत एकदाही मोजमाप करण्यात आलेले नाही, याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच खाण मालकांनी उत्खनन केलेले खड्डे भरून द्यावेत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसलेले क्रशर तात्काळ बंद करावेत, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर कृष्णा सावंत, मनोहर दळवी, श्रीकांत गवस, सुधीर सावंत, दत्तप्रसाद सावंत, मनोहर सावंत, निशम कृष्णा दळवी, विनया विनायक सावंत यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.