Devgad News : देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल!

शेअर करा

पहिल्याच पेटीला मिळाला तब्बल ३६ हजारांचा भाव!

देवगड,दि.३० ऑक्टोंबर

देवगड तालुक्यातील विजयदुर्ग घरीवाडी येथील आंबा बागायतदार मिलेश बांदकर आणि विद्याधर बांदकर यांच्या बागेतील यंदाच्या हापूस हंगामातील पहिली आंब्याची पेटी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये दाखल झाली. या पहिल्याच पेटीला तब्बल ३६ हजार रुपयांचा भाव मिळाल्याने देवगडच्या हापूस आंब्याची बाजारपेठेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बांदकर बंधूंनी पाठविलेली ही आंब्याची पेटी वाशी मार्केटमधील जनार्दन अँड कंपनी या दलालाकडे विक्रीसाठी पाठविण्यात आली होती. या पहिल्या पेटीच्या खरेदीसाठी वाशी मार्केटमध्ये मोठी रेलचेल पाहायला मिळाली. अखेर या पेटीला ३६ हजार रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती बांदकर बंधूंनी दिली.

यंदा हवामानातील बदलांचे आव्हान असतानाही बांधकर बंधूंनी विशेष मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर हापूस आंबा वेळेत बाजारपेठेत पाठविण्यात यश मिळवले आहे. हंगामातील पहिल्याच पेटीला मिळालेल्या या भरघोस दरामुळे आंबा बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवगडच्या हापूस आंब्याची चव आणि दर्जा पुन्हा एकदा मुंबईच्या बाजारपेठेत अधोरेखित झाला असून, आगामी हंगामातही हापूसला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आंबा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा