Banda News : फळपीक विमा नोंदणीसाठी मुदतवाढ द्या!

शेअर करा

नारळ, सुपारी, केळी उत्पादक शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची भीती; सुरेश गावडे यांची टीका.

बांदा,दि.३० ऑक्टोंबर
नारळ, सुपारी आणि केळी पिकाचा फळपीक विमा योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी या महत्त्वाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपत असून मुदतीत सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करणे भौतिकदृष्ट्या अशक्य असतानाही शासनाने दिलेली मुदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे, अशी टीका रोणापाल माजी सरपंच तथा प्रगतशील शेतकरी सुरेश गावडे यांनी केली आहे.
अजूनही बहुतांश शेतकऱ्यांची फळपीक ई-केवायसी झालेली नाही. महसूल खात्याने नेमलेले प्रतिनिधी नेट आणि रेंज अभावी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नारळ व सुपारी क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे ते पीक विम्याच्या लाभापासून डावलले जाण्याची भीती आहे.
​अनेक बागायतदारांना अद्याप ‘फार्मर आयडी’च मिळालेला नाही. नेटवर्क अभावी ई पीक नोंदणी करणेही शक्य नाही. त्यामुळे ​फळपीक नोंदणी सातबारा उताऱ्यावर पूर्ण होईपर्यंत आणि सर्व तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत विमा भरण्याची मुदत निदान ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात यावी, अशी आक्रमक मागणी सुरेश गावडे यांनी केली आहे.
​जर शासनाने तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मुदत वाढवून दिली नाही तर शेतकरी आणि शेतकरी संघटना तीव्र आंदोलनाचा बडगा उगारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेअर करा