Kankavli News : नांदगाव स्थानकावर विसरलेली पाच हजारांची बॅग काही तासांत महिलेच्या स्वाधीन..

शेअर करा

वाघेरीचे माजी सरपंच तथा सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम गुरव यांच्या सतर्कतेमुळे बॅग मिळाली परत; नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्या उपस्थितीत केली सुपूर्द

कणकवली,दि.३० ऑक्टोंबर

रेल्वे प्रवासादरम्यान नांदगाव रेल्वे स्थानकावर विसरलेली पाच हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाच्या वस्तू असलेली बॅग वाघेरीचे माजी सरपंच तथा विद्यमान सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम गुरव यांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत संबंधित महिलेला सुखरूप परत मिळाली. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्या तत्परतेमुळे या घटनेचा सुखद शेवट झाला. या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव मोरयेवाडी येथील संतोषी संतोष मोरये या महिला आपल्या लहान मुलासह रेल्वेने प्रवास करीत होत्या. नांदगाव रेल्वे स्थानकावर उतरण्याची वेळ आल्याने त्यांनी मुलाला खाली उतरवले आणि बॅगही स्थानकावर ठेवली. मात्र, रेल्वे पुन्हा सुरू झाल्याने गडबडीत पाच हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग स्थानक परिसरातच राहून गेली. यावेळी मुलगा मात्र सुखरूपपणे आईच्या स्वाधीन झाला.

दरम्यान, त्याच रेल्वेने प्रवास करणारे वाघेरीचे माजी सरपंच तुकाराम गुरव हेही नांदगाव स्थानकावर उतरले होते. त्यांच्या निदर्शनास ही बॅग आली. संबंधित महिला कोण आणि कुठल्या गावची, याची माहिती नसतानाही त्यांनी बॅग मालकिणीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांची तत्परता

संबंधित महिला नांदगाव, तोंडवली किंवा बावशी परिसरातील असावी, असा अंदाज बांधून तुकाराम गुरव यांनी आपल्या परिचितांमार्फत बॅगेच्या मालकिणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याचदरम्यान एका नागरिकाने नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्याशी संपर्क साधून मोरये नावाच्या महिलेची बॅग रेल्वे स्थानकावर राहिली असल्याबाबत विचारणा केली.

त्यावेळी वृषाली मोरजकर यांनी तत्काळ ओळख पटवत, नांदगाव मोरयेवाडी येथील संतोषी संतोष मोरये यांचीच बॅग असल्याचे सांगितले. संबंधित महिलेने यापूर्वीच त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे बॅगेच्या मालकिणीची खात्री पटली.

पाच हजारांची रक्कम आणि सर्व साहित्य सुरक्षित

यानंतर पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी संतोषी मोरये यांना सोबत घेऊन वाघेरी येथे जात बॅग त्यांच्या स्वाधीन केली. बॅग तपासली असता त्यामध्ये असलेली पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि इतर सर्व वस्तू सुरक्षित असल्याचे आढळून आले.

हरवलेली बॅग आणि त्यातील सर्व साहित्य सुखरूप परत मिळाल्याने संतोषी मोरये यांनी तुकाराम गुरव, पोलीस पाटील वृषाली मोरजकर तसेच या कामी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

या प्रसंगी वाघेरीचे माजी सरपंच तथा सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम गुरव, लिंगेश्वर-वाघेरीचे पोलीस पाटील अजिंक्य गुरव आणि नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर उपस्थित होते.

रेल्वे प्रवासातील धावपळीत विसरलेली बॅग प्रामाणिकपणा, सतर्कता आणि परस्पर सहकार्याच्या जोरावर काही तासांतच मालकिणीपर्यंत पोहोचल्याने या घटनेचे परिसरात कौतुक होत आहे.

शेअर करा