बांदा ,दि.०२ ऑगस्ट
बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छप्पर धोकादायक झाल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने छताची तातडीने दुरुस्ती करण्यात आली.
यावेळी माजी उपसरपंच आबा धारगळकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, अभियंता संदीप कल्याणकर, अक्षय परब, मुख्याध्यापिका आश्लेषा कांबळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी उपसरपंच आबा धारगळकर यांनी सांगितले की, वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले तुटून विद्यार्थ्यांसमोरच कोसळली. थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. याची तत्काळ दखल घेत लागलीच छप्पर दुरुस्ती करण्यात आली . विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सध्या तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून भविष्यात संपूर्ण छप्पर अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील. शाळा व्यवस्थापन समितीने छप्पर दुरुस्तीचा जो प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याध्यापिका आश्लेषा कांबळी यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करून दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानले. तर ग्रामपंचायतीच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळल्याने पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.