समितीच्या प्रारंभिक यादीत स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक प्रतिनिधींना डावलल्याचा आरोप; संतप्त कार्यकर्त्यांनी नोंदविला निषेध
बांदा,दि.१६ जून
राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नव्याने जन आरोग्य समित्यांची स्थापना करण्यात येत असून, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी समिती स्थापन करण्यासाठी विशेष बैठक पार पडली. मात्र, समितीच्या प्रारंभिक यादीत स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींना स्थान न दिल्याचा आरोप करत बांदा शहर विकास आघाडीने प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक देत आक्रमक भूमिका घेतली.
जन आरोग्य समितीच्या यादीत प्रामुख्याने एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही समितीत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी मागणी करत वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांना जाब विचारण्यात आला. यावेळी “समितीत केवळ एकाच पक्षाचे प्रतिनिधी दिसतात का? स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींना डावलण्याचे कारण काय?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यावर डॉ. सारंग यांनी जन आरोग्य समितीची रचना व मान्यता ही वरिष्ठ स्तरावरून होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्तरावरील योग्य प्रतिनिधीचे नाव सुचविल्यास त्याची नोंद समितीच्या यादीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर बांदा शहर विकास आघाडीचे सुशांत पांगम यांचा समितीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या समावेशानंतर निर्माण झालेला वाद निवळला.
दरम्यान, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात झालेल्या बैठकीत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जन आरोग्य समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची निवड करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर हे सह-अध्यक्ष तर वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग हे सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, पंचायत समिती सदस्य महेश घुरी, सदा राणे, ऋतिका नाईक, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, शेरले सरपंच प्रांजल जाधव, शंकर सावंत आदी उपस्थित होते.
शहर विकास आघाडीच्या धडक आंदोलनावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा ठाकरे सेनेचे शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, विभागप्रमुख ओंकार नाडकर्णी, अजय महाजन, राजेश पावसकर, अर्णव स्वार, विहुल (भाऊ) वाळके, रितेश नाटेकर, रियाज खान, प्रशांत पांगम आणि सुशांत पांगम आदी उपस्थित होते.
पूर्वी कार्यरत असलेली रुग्णकल्याण नियामक समिती बरखास्त करून तिच्या जागी जन आरोग्य समिती स्थापन करण्यात आली असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, समितीच्या स्थापनेच्या पहिल्याच दिवशी प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे जन आरोग्य समितीची चर्चा तालुकाभर रंगली.