​बांदा : मडूरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत नवीन विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

शेअर करा

बांदा ,दि.१५ जून
मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साही आणि आगळ्यावेगळ्या वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
​शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमधील भीती आणि दडपण दूर व्हावे, यासाठी शाळेच्या वतीने एका विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिकाजी धुरी यांनी सर्व नवीन चिमुरड्यांचे औक्षण केले आणि अत्यंत आपुलकीने त्यांचे शाळेत स्वागत केले. पारंपरिक आणि घरगुती वातावरणात झालेल्या या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.


​नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळा सुंदररीत्या सजवण्यात आली होती. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे प्रेमाने स्वागत केले. आपल्या पहिल्या दिवशी झालेल्या या शाही स्वागतामुळे नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक अत्यंत भारावून गेले होते.
​या कार्यक्रमाला स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेश गावडे, प्रवीण परब, मुख्याध्यापक नीती साळगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे हा स्वागत सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला.

शेअर करा