बांदा : बांदा स्मशानभूमी परिसरातील कचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी; ग्रामपंचायतीकडून तातडीची स्वच्छता मोहीम

शेअर करा

बांदा शहर विकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश; अस्वच्छतेवर उपाय म्हणून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला

बांदा ,दि.१६ जून
बांदा येथील सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या प्रश्नाची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. बांदा शहर विकास आघाडीने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


काही दिवसांपूर्वी स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत होती. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बांदा शहर विकास आघाडीने सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली होती.


या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तत्परता दाखवत स्मशानभूमी परिसर, तेथील संपर्क रस्ता तसेच लगतचा ओहोळ यांची यंत्रणेमार्फत संपूर्ण साफसफाई केली. कचऱ्याचे ढिगारे हटविण्यात आल्याने परिसर पुन्हा स्वच्छ व सुस्थितीत आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच बाळू सावंत, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आबा धारगळकर यांनी स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेत आवश्यक कार्यवाही केली. बांदा शहर विकास आघाडीचे सुशांत पांगम यांनीही यासाठी सहकार्याची भूमिका बजावली.


दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी अपेक्षा शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत गावातील स्वच्छतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून भविष्यातही आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविल्या जातील, अशी ग्वाही सरपंच प्रियांका नाईक यांनी दिली.

शेअर करा