खड्डे, पाणी साचणे व झाडीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना
बांदा,दि.२३ ऑगस्ट
निरवडे, आरोस तिठा, न्हावेली विवरवाडी, दांडेली, कोंडूरा, तळवणे आणि आरोंदा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेची न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देत गणेशोत्सवापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पूजा इंगवले व उपअभियंता पाटील यांनी दखल घेत संबंधित अधिकारी व ठेकेदाराना प्रत्यक्ष पाहणी करण्याची सूचना केली.
यावेळी अक्षय नाईक, राज धवण, रुपेश मोरजकर, कुलदीप नार्वेकर आणि प्रज्योत मालवणकर, अधिकारी रुपेश पवार उपस्थित होते.
निरवडे-न्हावेली-दांडेली-कोंडूरा-तळवणे-आरोंदा या प्रमुख मार्गावरील न्हावेली विवरवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दांडेली, कोंडूरा व तळवणे परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्यालगत वाढलेल्या झाडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
पाहणीदरम्यान खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे आणि वाढलेली झाडी यांची पाहणी करण्यात आली. पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे, खड्डे बुजविणे तसेच रस्त्यालगतची झाडी हटविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असल्याने कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.