बांदा : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार

शेअर करा

बांदा ,दि.१३ ऑगस्ट
सामाजिक, शैक्षणिक आणि युवक विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्था गरजू, वंचित आणि ग्रामीण घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.
शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास, ग्रामविकास, पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात संस्थेने केलेल्या कार्याची शासनाने दखल घेतली आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रवींद्र खेबुडकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण शासकीय पावती मानली जात आहे. पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यकर्ते, स्वयंसेवक, दाते आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यात अधिक व्यापक व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे.

शेअर करा