Banda : शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

शेअर करा

शेतमालाला योग्य बाजारपेठ व रास्त दर मिळवून देण्यावर भर; बांद्यातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन

बांदा,दि.१२ ऑक्टोबर
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ आणि रास्त दर मिळवून देण्यासोबतच आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषीविषयक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही काळाची गरज आहे. कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होणारे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
बांदा येथे कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रमोद कामत यांच्या हस्ते फीत कापून, तर भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कंपनीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या उत्पादनाचे योग्य नियोजन करणे आणि शेतमालाला चांगला भाव मिळवून देणे या उद्देशाने दयानंद कुबल यांनी कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. कंपनीचे कार्य भविष्यात कोकणातील सर्व भागांत पोहोचावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक शेतीसह बाजारपेठेवर लक्ष
शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करून योग्य दर मिळवून देणे, कृषी उत्पादनांसाठी सक्षम बाजारपेठ उपलब्ध करणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, रोपे व शेतीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, ही कंपनीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे बांदा परिसरातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

या उद्घाटन सोहळ्याला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्या प्रियांका देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब, भाजप बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, वाफोली उपसरपंच विनेश गवस, कास सरपंच प्रवीण पंडित, डिंगणेचे माजी उपसरपंच जयेश सावंत, समर्थ नर्सरीचे अर्जुन मोरजकर, प्रवीण देसाई यांच्यासह बांदा पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा