बांदा : पावसाळ्यापूर्वी बांदा आरोग्य केंद्र सज्ज करा; युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांची मागणी

शेअर करा

बांदा ,दि. १२ जून
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या विविध आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांना वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी युवासेना (शिंदे गट) सावंतवाडी तालुकाप्रमुख रियाज खान यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले.


बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक गावे व वाड्या-वस्त्या येतात. पावसाळ्यात दूषित पाणी, बदलते वातावरण आणि संसर्गजन्य रोगांमुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य केंद्राने पूर्वतयारी म्हणून आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच सर्पदंश व रेबीजच्या घटनांचा विचार करून संबंधित लसींचा पुरेसा साठा ठेवावा, गर्भवती महिलांसाठी आवश्यक औषधे व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. गावांतील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याची तपासणी करून दूषित पाणी आढळल्यास तातडीने शुद्धीकरणाची उपाययोजना करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांचे आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्याने प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे रियाज खान यांनी सांगितले. निवेदन स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख मोईन खान, विभाग प्रमुख राजेश विरनोडकर, तसेच पांडुरंग नाटेकर, भैय्या गोवेकर, सैफान खान, सर्पमित्र राजा खान आदि उपस्थित होते.

शेअर करा