बांदा,दि.११ सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्हावेलीतील अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर झाला आहे.
न्हावेली ग्रामसडक योजनेच्या या रस्त्याची देखभाल-दुरुस्तीची मुदत संपल्याने दुतर्फा वाढलेल्या झाडीची सफाई रखडली होती. रस्त्यावरील अनेक वळणांवर झाडी वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
ही बाब लक्षात घेऊन अक्षय पार्सेकर यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांशी संपर्क साधत तातडीने कार्यवाहीची मागणी केली. कंत्राटदाराशीही सातत्याने संपर्क साधून प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कंत्राटदाराने मजूर व यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी साफ केली. गणेशोत्सवासाठी गावात येणाऱ्या चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी या कार्यवाहीचे स्वागत केले.