बांदा,दि.०९ सप्टेंबर
इन्सुली गावासह सावंतवाडी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास आणि लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न सन्मान’ जाहीर झाला आहे. त्यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल घेत ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ’ या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे हा सोहळा होणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून राऊळ यांनी ग्रामीण भागातील रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, युवक व क्रीडा क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जिल्हा शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांनाही प्राधान्य दिले आहे. तसेच इन्सुली मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर झाल्याने इन्सुलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे