बांदा : कासमध्ये पुन्हा ‘ओंकार’ हत्ती दाखल

शेअर करा

तांबोशे-मोपा परिसरात बागायतींचे नुकसान; हत्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

बांदा,दि.०८ सप्टेंबर

गोवा-सिंधुदुर्ग सीमाभागात वावरणारा ‘ओंकार’ हत्ती मंगळवारी सकाळी कास परिसरात दाखल झाला आहे. काल तांबोशे-मोपा परिसरात बागायतींमध्ये फिरून नुकसान केल्यानंतर ओंकारने कासच्या दिशेने आगेकूच केली. सकाळच्या सुमारास तो कास येथे दाखल झाल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

तांबोशे-मोपा परिसरातील बागायतींमध्ये ओंकारने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती मिळत असून, कास परिसरातही त्याच्या वावरामुळे बागायतींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, नुकसानीचा नेमका अंदाज त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, ओंकार कास परिसरात दाखल झाल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकजण मोबाईलमध्ये हत्तीचे फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. हत्तीच्या जवळ न जाता सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ओंकारच्या सततच्या वावरामुळे कास, तांबोशे-मोपा परिसरातील शेतकरी व बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बागायतींचे नुकसान होत असल्याने वनविभागाने हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

शेअर करा