बांदा : इन्सुलीत ‘ओंकार’चे दर्शन; महामार्गालगत हत्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

शेअर करा

वाफोली–इन्सुली परिसरात वावर कायम; मोबाईलमध्ये फोटो-व्हिडिओ टिपण्यासाठी नागरिकांची उत्सुकता

बांदा, दि. ७ जून
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेला ‘ओंकार’ हत्ती गेल्या काही दिवसांपासून वाफोली व इन्सुली परिसरात वावरत आहे. रविवारी सकाळी तो इन्सुली येथील बांदा–सावंतवाडी महामार्गालगत आल्याने नागरिकांची एकच गर्दी झाली.
हत्ती महामार्गाच्या जवळ असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, युवक व लहान मुलांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. अनेकांनी मोबाईलवर त्याचे फोटो व व्हिडिओ चित्रीत केले. काही काळ महामार्गावरील वाहनचालकांचेही लक्ष ‘ओंकार’कडे वेधले गेले होते.
दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्ती महामार्गावरच थांबू नये आणि गर्दीच्या दिशेने येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी केळीचा वापर करत त्याला महामार्गापासून दूर नेण्याचे प्रयत्न केले. अखेर वनविभागाला ‘ओंकार’ला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने वळविण्यात यश आले.
गेल्या काही दिवसांपासून वाफोली आणि इन्सुली परिसरात ‘ओंकार’चा मुक्त वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये त्याच्याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, जंगली प्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे किंवा गर्दी करणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.

शेअर करा