बांदा,दि.१० ऑगस्ट
पाडलोस ग्राम बाल संरक्षण समितीची सभा सरपंच सलोनी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पाडलोस ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडली. गावातील बालकांचे संरक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सभेला समिती सदस्य पोलिस पाटील रश्मी माधव, शिक्षक विजय गावडे, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, आरोग्यसेविका विजया गावडे, सीआरपी नेहा नाईक, उपसरपंच राजू शेटकर व ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा गावडे उपस्थित होते.
बालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच विविध संकटांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी समितीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये मुलांना कराटे प्रशिक्षण व मार्गदर्शन, पोलिस विभागामार्फत कायदेविषयक मार्गदर्शन, तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय बालकांच्या शिक्षण, सुरक्षितता, आरोग्य आणि हक्कांशी संबंधित विविध विषयांवरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक विजय गावडे यांनी केले, तर आभार अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर यांनी मानले.