बांदा : पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे २६ ऑगस्टला लोकार्पण

शेअर करा

बांदा,दि.२४ ऑगस्ट
गोवा-महाराष्ट्र सीमेवरील ऐतिहासिक पत्रादेवी येथील नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मारकाचा लोकार्पण सोहळा बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार असून, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गोवा मुक्ती संग्रामाच्या इतिहासात पत्रादेवी परिसराला विशेष महत्त्व आहे. गोवा मुक्तीसाठीच्या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या परिसरातून आंदोलनात सहभाग घेतला. हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या स्मारकाचे गोवा सरकारने नूतनीकरण व सुशोभीकरण केले आहे.

नव्या पिढीला गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास, देशभक्ती आणि हुतात्म्यांचा त्याग समजावा, या उद्देशाने स्मारक परिसर विकसित करण्यात आला आहे. आकर्षक स्वरूपामुळे हे स्मारक पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २५ ऑगस्ट रोजी होणारा लोकार्पण सोहळा अपरिहार्य कारणामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाकडे गोवा तसेच सिंधुदुर्गातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा