बांदा : न्हावेली जोड रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

शेअर करा

अक्षय पार्सेकर यांच्या इशाऱ्याची धडक दखल

बांदा,दि.१४ जून

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांनी आणि माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले असून वादग्रस्त रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या तीव्र उपोषणाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली.
न्हावेली जोड रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. तसेच रस्त्यालगतची गटारे अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आली होती. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
या रस्त्याच्या दुरुस्तीची मुदत ३० मे २०२६ रोजी संपूनही कंत्राटदाराने आवश्यक कामे पूर्ण केली नव्हती. विशेषतः जोड रस्ते व घरांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप्सच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेले सिमेंट-दगडांचे संरक्षणात्मक बांधकाम करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचण्याचा व पाईप वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा अक्षय पार्सेकर व ग्रामस्थांनी दिला होता. याबाबत कार्यकारी अभियंता, कुडाळ यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि कंत्राटदाराला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले.
अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे हा रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने न्हावेली परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा