बांदा : रोट्रॅक्ट बांदा तर्फे घारपी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकांचे वितरण

शेअर करा

बांदा, दि.१२ ऑगस्ट
रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेल्या घारपी येथील प्राथमिक शाळेला भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव सुलभ व्हावा, यासाठी आवश्यक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षा मिताली सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक प्रगतीसाठी जिद्द आणि चिकाटीचे महत्त्व पटवून दिले. तसेच क्लबचे सचिव संकेत वेंगुर्लेकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तयारी आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी रोट्रॅक्ट क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी ग्रामस्थ दीपक गावडे यांच्या वतीने रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा निगुडकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मयूर मसुरकर याने मानले. या प्रसंगी रोट्रॅक्टचे सदस्य रुपेश सावंत यांच्यासह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे व आशिष तांदुळे यांनी विशेष सहकार्य केले.

शेअर करा