३ हजार मीटर धावण्यात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक; आरोसच्या शिरपेचात मानाचा तुरा
बांदा,दि.२४ ऑक्टोंबर
जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडास्पर्धेत विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथील नववीतील विद्यार्थिनी सानिका मनोहर शेळके हिने उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील वयोगटातील ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश मिळविला.
सानिकाने आपल्या जिद्द, मेहनत आणि दमदार धावण्याच्या जोरावर हे यश संपादन केले. तिची रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या विभागीय मैदानी क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे आरोसच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम, सचिव शांताराम गावडे, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धेश नाईक, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सानिकाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.