व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांची मागणी : अपघात टाळण्यासाठी कार्यवाहीची गरज
बांदा,दि.०९ ऑगस्ट
पाडलोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
शाळेच्या परिसरातून मुख्य रस्ता जात असून, या ठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी धोकादायक वळण आहे. शाळेतील लहान मुले खेळताना अथवा शाळेत ये-जा करताना अचानक रस्त्यावर आल्यास भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाळेजवळच असलेल्या वळणामुळे समोरून येणारे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना एकमेकांचा अंदाज सहज येत नाही. त्यामुळे हा परिसर अपघाताच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.
याच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय असल्याने विविध कामांसाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याने कोणत्याही निवेदनाची प्रतीक्षा करता याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे पाडलोस येथील सामाजिक कार्यकर्ते सागर गावडे यांनी सांगितले.
सुरक्षा फलकाची गरज
अनुचित घटना घडण्याची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून शाळेच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक उभारावेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा फलक व रस्त्यावर सूचना पट्टे लावावेत, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे यांनी केली आहे.