बांदा : नूतन माध्यमिक विद्यालयात ‘कोकण गोरत्न’तर्फे क्रीडा साहित्य वाटप

शेअर करा

क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना

बांदा,दि.०५ सप्टेंबर
इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कोकण गोरत्न फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व असून, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नियमितपणे विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. क्रीडा साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे शाळेतील क्रीडा संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मुख्याध्यापक शेवाळे सर यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर मनोज साळगावकर, संजय भाईप, मुख्याध्यापक शेवाळे सर, चव्हाण सर, सावंत मॅडम, आजगांवकर सर आणि पालव मॅडम उपस्थित होते.

शेअर करा