हरी गजानन धुरी यांच्या घराच्या छपराचे व मालमत्तेचे नुकसान; अचानक घडलेल्या घटनेने परिसरात घबराट
बांदा,दि. ६ जुलै
इन्सुली-परबवाडी परिसरात अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली. येथील स्थानिक रहिवासी हरी गजानन धुरी यांच्या राहत्या घरावर माडाचे एक भलेमोठे झाड अचानक कोसळले. या अपघातात घराच्या छपराचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

रविवारी रात्री ठीक 10.30 वाजता झाड कोसळले तेव्हा कुटुंबातील सदस्य घरातच होते, ज्यातील काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, सुदैवाने एक मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
झाड कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि घरात अडकलेल्यांना बाहेर काढत मदतकार्य केले. या अचानक आलेल्या संकटामुळे धुरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घराचे छप्पर पूर्णपणे उध्वस्त झाले असून घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी यावे, परिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा रीतसर पंचनामा करावा आणि प्रशासनाकडून धुरी कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत व योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.